श्रीनगर – शनिवारी काश्मीर आणि लडाखमध्ये नव्याने बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीबरोबरच तेथे तुफानी पाऊसही झाला आहे. अजूनही गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम, शोपियॉं आणि गुरेझ सेक्टरमध्ये अजूनही तुफानी पाऊस सुरू असल्याचे वृत्त आहे.
लडाखच्या मिनामार्ग आणि द्रास सेक्टरमध्येही पाऊस पडत आहे. शुक्रवारी रात्रीपासून तेथे बर्फवृष्टीही सुरू झाली आहे. पुलवामा, कुलगाम या जिल्ह्यांमध्येही बर्फवृष्टी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.
श्रीनगर शहरालाही कालपासून तुफानी पावसाने झोडपले आहे. श्रीनगर शहरात पाऊस सुरू झाला की झाडाच्या फांद्या पडून वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या अनेक घटना घडत असतात पण यावेळी वीज मंडळाने शहरातील अडथळा ठरू शकतील, अशा बहुतांश झाडांच्या फांद्या तोडून टाकल्या आहेत.
त्यामुळे काल वीज खंडित होण्याचा प्रकार घडला नाही. पुढील 24 तासांतही काश्मिरात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.