मुंबई – ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. रामायणावर आधारित या चित्रपटातील पात्रांच्या पेहरावामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आवाज उठवला होता. मात्र त्यात काहीसे बदल करत आता हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरनंतर या चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे. येत्या १६ जूनला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या चित्रपटाबाबत बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी मोठी घोषणा केली आहे.
अभिषेक अग्रवाल यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाची तब्बल १० हजार तिकिटांचं मोफत वाटप करणार आहेत. याबाबत त्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “श्री राम यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेमुळे मी आदिपुरुष चित्रपटाची १० हजार तिकिटे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणामधील सरकारी शाळा, अनाथश्रम आणि वृद्धाश्रमातील लोकांना ही तिकीटे दिली जाणार आहेत,” यासोबत त्यांनी मोफत तिकिटासाठी गुगल फॉर्मची लिंक देखील शेअर केली आहे.
#Adipurush is a once in a lifetime movie which needs to be celebrated by one and all.
Out of my devotion for Lord Shree Ram, I have decided to give 10,000+ tickets to the Government schools, Orphanages & Old Age Homes across Telangana for free.
Fill the Google form with your… pic.twitter.com/1PbqpW9Eh6
— Abhishek Agarwal 🇮🇳 (@AbhishekOfficl) June 7, 2023
दरम्यान, या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला तेव्हा बराच वाद झाला होता. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या VFX ची लोकांनी खूप चर्चा केली होती. त्यानंतर त्याचे प्रदर्शनही काही काळ पुढे ढकलण्यात आले. आता निर्मात्यांनी निवेदन जारी करत चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट आता १६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास रामाच्या आणि क्रिती सेनॉन सीतेच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सैफ अली खान रावणच्या आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.