बेकरी चालकाकडे खंडणी मागणाऱ्या चार तोतयांना अटक

पिंपरी – अन्न प्रशासन विभागाकडून कारवाईसाठी आलो असल्याचे भासवून चार जणांनी मिळून एका बेकरी चालकाला कारवाई न करण्यासाठी खंडणी मागितली. हा प्रकार शनिवारी (दि. 21) रात्री साडेआठ वाजता तळवडे रोडवरील हुमा बेकरी येथे घडला. पोलिसांनी चार तोतया अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

रणजित धोंडीराम भोसले (वय 54, रा. आळंदी रोड, पुणे), संजय श्रीशैल मल्लाड (वय 34, रा. मोशी प्राधिकरण), राम नारायण सुर्वे (वय 50, रा. शिवतेजनार, चिखली), प्रदीप देवराम मालकर (वय 36, रा. रुपीनगर, तळवडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस संतोष जाधव यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे रोडवर हुमा बेकरी आहे. आरोपींनी तोतयागिरी करून आपण अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून बेकरीवर कारवाई करण्यासाठी आलो असल्याची बतावणी केली. बेकरीतील काउंटरवर असलेल्या फैजल हनीफ अन्सारी (वय 25) यांना ब्रेडच्या पॅकेटवर तारीख टाकलेली नाही व बेकरीतील काही पदार्थ पॅकबंद नाहीत, असे म्हणून कारवाईची भीती घातली.

कारवाई न करण्यासाठी पावती किंवा पैशांची सेटलमेंट करण्यास सांगून खंडणीची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.