सातशेहून अधिक कुटूंबाची दिवाळी रुग्णालयातच

  • “करोना’चा परिणाम; शेकडो डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांचेही दिवाळीपेक्षा कर्तव्याला महत्त्व

पिंपरी – यंदा करोनामुळे दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळातही डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सेवा करत रुग्णाणालयातच दिवाळी साजरी केली. धनत्रयोदशी ते भाऊबीज या चार दिवसांच्या कालावधीत सरासरी 700 रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. त्यांच्या सेवेसाठी महापालिकेचे डॉक्‍टर, परिचारिका, वॉर्डबॉय हे कर्तव्यावर होते. त्या सर्वांनीच एकमेकांना आधार देत रुग्णालयात दिवाळी साजरी केली.

शहरामध्ये यंदा करोनाच्या सावटाखाली दिवाळी साजरी झाली. त्यामध्ये शहरातील सुमारे सहाशे व शहराबाहेरील सरासरी 100 रुग्णांना रुग्णालयातच कुटूंबापासून दूर राहत दिवाळी साजरी करावी लागली. ऐन दिवाळीमध्ये त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम, ऑटो क्‍लस्टर, भोसरी रुग्णालय, जिजामाता व जम्बो रुग्णालयामध्ये रहावे लागले. यामुळे यंदा त्यांच्या घरी दिवाळी झाली नाही. दरवर्षीप्रमाणे अभ्यंगस्नान, ओवाळणी आणि फराळाचा आनंद त्यांना घेता आला नाही. मात्र जरी कुटुंबापासून दूर असले तरी रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांनी रुग्णांची चांगली काळजी घेत दिवाळी साजरी केली.

धनत्रयोदशीच्या दिवशी शुक्रवारी (दि. 13) शहरातील 643 व शहराबाहेरील 98 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी शनिवारी 610 व 126 रुग्ण कुटुंबापासून दूर रुग्णालयात होते. दीपावली पाडवा व भाऊबीजेच्या दिवशीही शहरातील 611 व शहराबाहेरील 93 रुग्ण रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांना दिवाळीचा आनंद कुटुंबियांसोबत घेता आला नाही.

व्हिडिओकॉलचा आधार
रुग्णालयामध्ये असलेल्या रुग्णांना आपल्या नातोवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉलचा आधार होता. अनेक जणांनी भाऊबीजेच्या दिवशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून भाऊबीज साजरी केली. आपली बहिण व भाऊ उपचारासाठी दाखल झाल्याने अनेकांनी व्हिडिओ कॉल करत आनंद व्यक्त केला व एकमेकांना आधार दिला.

दिवाळीची पणती लागलीच नाही
दरम्यान दिवाळीच्या काळात शहरामध्ये 11 जणांचा करोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 5 जणांचा व शहराबाहेरील 6 जणांचा समावेश होता. करोनाने घरातील सदस्य हिरावल्याने यंदा त्यांच्या घरात दिवाळीचा दिवा लागलाच नाही.

दिवाळीच्या काळात संपूर्ण स्टाफ रुग्णांच्या सेवेसाठी कामावर होता. घरच्यासारखे वातावरण देत कर्मचारी रुग्णांची सेवा करत आहेत. वायसीएम रुग्णालयामध्ये सद्यस्थितीत दोन आयसीयूमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याच पद्धतीने महापालिकेच्या सर्वच रुग्णालयामध्ये डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सेवा करत दिवाळी साजरी केली.
– डॉ.  राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.