प्रेरणा : यशाला गवसणी

-दत्तात्रय आंबुलकर

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातल्या सावरकुंडला या छोट्या गावात राहणाऱ्या कोमलला 80 च्या दशकातही आपल्या हक्‍कांसाठी कधी झगडावे लागले नाही. कुठलाही भेदभाव सहन करावा लागला नाही. छोट्या गावात राहूनही कोमलला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते.

स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार होता. म्हणूनच कोमलनेही भरपूर शिकायचे ठरविले.कोमलच्या वडिलांनी तिच्या शिक्षणाला खूप महत्त्व दिले. त्यांनी तिला वयाच्या चौथ्या वर्षीच भारतीय प्रशासकीय सेवेची तोंडओळख करून दिली. कोमलने संस्कृत, हिंदी व इंग्रजी साहित्य या विषयांसह पदवी तर मिळविलीच त्याशिवाय संगीताचा छंद जोपासून ती विशारद झाली.
त्यानंतर कोमलने यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली. मात्र, त्याचवेळी कोमलचे लग्न ठरले. न्यूझीलंडमधल्या अनिवासी भारतीय मुलाशी तिचे लग्न होणार होते. वयाच्या 26 व्या वर्षी कोमल लग्न करून सासरी आली.

सुदैवाने कोमलचे सासर सुशिक्षित व प्रगतीशील विचारांचे होते. मात्र, त्यांचा हुंड्यासाठीचा आग्रह लग्नानंतर पण कायम होता. हुंड्याच्या या अट्टहासापायी त्यांनी कोमलला घर सोडून जाण्यास सांगितले. त्याला कोमलने कडाडून विरोध केला. तशातच तिचा नवरा न्यूझीलंडला निघून गेला तो परत न येण्यासाठीच. पतीच्या शोधासाठी कोमलने जंग जंग पछाडले. भारत व न्यूझीलंड सरकारकडे मदत मागितली; पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

त्यावेळी कोमल थोडी निराश झाली. पण शिक्षण आणि लहानपणापासून झालेल्या सक्षमीकरणाच्या संस्कारांनी तिला पुन्हा उभे केले. हुंडाप्रकरणी सासरच्यांना कायद्याने शिक्षा व्हावी यासाठी तिने कसोशीने प्रयत्न केले. पण त्याचाही फारसा काही उपयोग झाला नाही. यामुळे सरकारी व्यवस्थेचा भाग बनून बदल घडवून आणण्यासाठी काम करण्याचे तिने ठरविले. त्यानुसार कोमलने पुन्हा यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यासाठी कोमल भावनगरमधल्या छोट्या गावात आली.

नव्या गावी तिने मासिक 5 हजार रुपयांची शिक्षिकेची नोकरी स्वीकारली व आपली यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. त्या छोट्या गावी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक अशी पुस्तके, वाचनालय, मार्गदर्शन अशा सोयी नव्हत्या. त्यावर तोडगा म्हणून कोमल सोमवार ते शुक्रवार गावी शिक्षिकेचे काम करायची व शनिवार-रविवारी मुंबईला यूपीएससीच्या मार्गदर्शन सत्रासाठी उपस्थित राहायची.

ही सर्व धडपड आणि प्रयत्नांचे फळ कोमलला मिळाले. 2012 मध्ये कोमलला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 591 व्या स्थानासह यश मिळाले. तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या त्यावेळच्या 11 उमेदवारांमध्ये तिचा समावेश होता. मधल्या काळात कोमलचे दुसरे लग्न झाले. तिला एक मुलगीही झाली.

सध्या कोमल राजधानी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आयुष्यातील सांसारिक अडचणींमुळे निराश न होता धडपड व प्रयत्नांसह यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी धडपडणाऱ्या असंख्य महिलांसाठी कोमलचा हा प्रवास निश्‍चितच प्रेरणादायी ठरला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.