पुणे – डीईएस नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षापासून ऍडव्होकसी स्किल्स व मेडिको लीगल, सॉफ्ट स्किल, लॉ व सायकॉलॉजी आणि लॉ व इकॉनॉमिक्स हे चार नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.
ऍडव्होकेसी स्किल्स व मेडिको लीगल या अभ्यासक्रमाला दुसऱ्या वर्षाचे बी.ए.एल.एल.बी. किंवा बी.बी.ए.एल.एल.बी.चे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. इतर तीन अभ्यासक्रमांसाठी पहिल्या वर्षीच्या बी.ए.एल.एल.बी. किंवा बी.बी.ए.एल.एल.बी.च्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. व्यावहारिक आणि सैद्धांतिक अभ्यासक्रमातील अंतर कमी करून विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.
लॉ, न्यायव्यवस्था, विधी, वैद्यक, न्यायवैद्यक यासारख्या क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्याने विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (दि.20) सकाळी 11 वाजता नवीन अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या वेळी “स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती अभिनव भारत व्यासपीठा’ची स्थापना धनखर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.