पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने डी.एल.एड.च्या प्रथम वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतीत नोंदणी न केलेल्या सहा अध्यापक विद्यालयांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड आकारुन त्यांना नोंदणीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.
बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्या प्राधिकरणाकडून त्वरीत डी.एल.एड.च्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. प्रवेशासाठी आधी अध्यापक विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. या मुदतीत 581 अध्यापक विद्यालयांनी नोंदणी केली.
या विद्यालयांनी प्रवेशासाठी एकूण 31 हजार 809 एवढ्या जागा दर्शविण्यात आल्या आहेत. यात शासकीय कोट्यात 20 हजार 930 तर खासगी व्यवस्थापन कोट्यात 10 हजार 879 याप्रमाणे प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. डी.एल.एड. च्या प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक नुकतीच झाली. मुदतीत नोंदणी न केलेल्या अध्यापक विद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नोंदणी करण्यासाठी पुन्हा संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर सविस्तर चर्चा करुन दंड आकारुन संबंधित अध्यापक विद्यालयांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी होकार दर्शविण्यात आलेला आहे. यामुळे प्रवेशाच्या जागांमध्ये काही वाढ निश्चित होणार आहे,अशी माहिती विद्या प्राधिकरणातील शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे यांनी दिली आहे.
डी.एल.एड. प्रवेशासाठी उमेदवारांना अर्ज नोंदणी करण्यासाठी 9 ऑगस्टपासून सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून 22 ऑगस्ट पर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.
डी. एल. एड.प्रवेश
उमेदवारांची नोंदणी 3906
अर्ज अपूर्ण 1642
पूर्ण अर्ज 900
दुरुस्तीचे अर्ज 326
पात्र अर्ज 1036