नोएडा – चारधाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या जीपचा नोएडा नजीक झालेल्या अपघातात बारामतीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या गाडीतून सात जण प्रवास करीत होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघातग्रस्त गाडीचा चालक गंभीर जखमी आहे. गाडीमधील आणखी दोन महिला गंभीर जखमी झाले आहेत.
चारधाम यात्रेसाठी एकूण पन्नास लोक महाराष्ट्रातून निघाले होते. काल रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. नोएडा पासून काही अंतरावर जेवर या गावाजवळ डंपरला जीपने मागून धडक दिली. यामध्ये बारामतीतील चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे हे दांपत्य, रंजना भरत पवार व मालन विश्वनाथ कुंभार या चौघांचा मृत्यू झाला आहे.
जीप चालक नारायण कोळेकर गंभीर जखमी झाला असून त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. नोएडामधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त निपाणी येथील मुजावर कुटुंबातील दोन महिलादेखील या अपघातात जखमी झाल्या आहेत.