रांजणगाव गणपती (पुणे) – रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी विविध प्रकारच्या चार गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातील दुचाकी व मोबाईल जप्त करुन त्यांना अटक केली.
पहिल्या गुन्ह्यात योगेश देवकर, सूरज नरवडे, सुग्रीव कोठावळे (सध्या राहणार कारेगाव) व शहाबाज इक्बाल सैय्यद (रा. अहमदनगर) यांनी सुमारे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरी केली होती. तर दुसऱ्या गुन्ह्यात दोन ठिकाणी घरफोडी केली होती.
रांजणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांनी मलठण येथील वैभव नारायण पवारयास रांजणगाव हद्दीत मोबाईल व मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये पकडले होते. त्याच प्रमाणे टाकळी हाजी येथील दत्तात्रय भाकरे यास मोबाईल चोरीच्या गुन्ह्यामध्ये पकडले होते. त्याच्याकडून आठ हजार पाचशे रुपये किमतीचा मोबाईल व दुचाकी जप्त केले आहे. अशा एकूण चार गुन्ह्यांमध्ये रांजणगाव पोलिसांनी सुमारे 2 लाख 28 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.