इस्लामाबाद – पाकिस्तानच्या राजधानीच्या शहरात पहिले हिंदू मंदिर उभे राहात असून त्याच्या कामाला आजपासून प्रारंभ झाला. हे मंदिर दहा कोटी रुपये खर्चून उभारले जात असून 20 हजार चौरस फूट जागेवर ते उभे राहात आहे. हे कृष्णाचे मंदिर आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाचे संसदीय सचिव लालचंद मल्ही यांच्या हस्ते आज त्याचा पायाभरणी कार्यक्रम झाला. पाकिस्तान सरकारतर्फे हे मंदिर उभारले जात आहे.
यावेळी बोलताना लालचंद म्हणाले की, सन 1947 च्या सुमाराला या परिसरात आणि पाकिस्तानात अन्यत्रही हिंदूंची अनेक मंदिरे होती. पण त्यातील बऱ्याच मंदिरांची पडझड झाली आहे. इस्लामाबादमध्ये हिंदू लोकसंख्या गेल्या दोन दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्यासाठी या शहरात मंदिराची मोठीच गरज होती.
इस्लामाबादमध्ये हिंदूंसाठी स्मशान भूमी नाही. त्याचीही सोय सरकारने केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पाकिस्तानचे धार्मिक व्यवहार मंत्री पीर नरूल हक कादरी हेही यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले की, या मंदिराच्या उभारणीचा सर्व खर्च पाकिस्तान सरकार उचलणार आहे. या मंदिराचे व्यवस्थापन हिंदू पंचायतीकडे सोपवले जाणार आहे. या मंदिराच्या परिसरातच हिंदूंच्या दहन विधीसाठी जागा देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.