गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश : शहरात येणाऱ्यांची ग्रामपंचायतीत नोंद बंधनकारक
पुणे – जिल्ह्यातील हवेली तालुका शहरालगत असल्यामुळे सध्या “करोना हॉटस्पॉट’ बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गटविकास अधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलत कामानिमित्त शहरात ये-जा करणाऱ्यांची आता ग्रामपंचायतीमध्ये नोंद होणार आहे. त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी सांगितले. तसेच वय वर्षे 60 व त्यापुढील व्यक्ती, मधुमेह, रक्तदाब, अस्थमा यासह अन्य आजार असलेल्या व्यक्तींनी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घ्यावे, असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवेली तालुक्याचा बहुतांश भाग हा शहरी भागात येतो. दररोज हजारो लोक कामानिमित्त शहरासह उपनगरांमध्ये जात असतात. शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना अशा परिस्थितीत शहरात कामानिमित्त येणारे नागरिक कळत-नकळत स्वत:सह कुटुंबाला आणि गावाची सुरक्षितता धोक्यात आणत आहे. याचा परिणाम हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
करोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हवेली पंचायत समितीकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांनी नुकतेच दोन आदेश काढले आहेत. त्यामध्ये कामानिमित्त शहरात ये-जा करणाऱ्यांनी हमीपत्र लिहून देणे बंधनकारक आहे. त्यामध्ये कोणत्या कंपनीत/संस्थेत काम करतो, परिसर कोणता याची माहिती देऊन, मी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क, रूमाल लावेल.
सार्वजनिक वस्तू वापरण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर करेल, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणार नाही. कामावर जाताना आणि आल्यावर स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेईल. कुटुंबापासून सुरक्षित अंतर ठेवून राहील, असे हमीपत्र ग्रामस्थांवर बंधनकारक केले आहे.
या नियमाचे उल्लंघन केल्यास शासकीय नियमाप्रमाणे दंडास व कार्यवाहीस पात्र राहील, असे हमीपत्र लिहून द्यायचे आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास काय कारवाई, मास्क न लावल्यास काय कारवाई याचे आदेशही यावेळी देण्यात आले.