मोरादाबाद – उत्तर प्रदेशात मोरादाबादेत “सीएए’विरोधी आंदोलनादरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अझिज कुरेशी यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
मोरादाबादमधील इदगाह मैदानावर 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या “सीएए’विरोधी आंदोलनामध्ये अझिज कुरेशी सहभागी झाले होते. तेथे आंदोलकांसमोर भाषण करताना कुरेशी यांची भावना भडकावणारे आणि चिथावणी देणारे भाषण केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुलशहिद पोलीस स्थानकामध्ये भारतीय दंड संहितेच्या 143,145, 149 आणि 188 कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मोरादाबाद शहराचे पोलीस अधिक्षक अमित कुमार आनंद यांनी सांगितले.
यापूर्वी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना धर्माच्या आधारावर भेदभाव करण्याचा अधिकार नाही. असा भेदभाव करणे घटनाबाह्य आहे. हे दोघेही फुटीचे धोरण अवलंबत असून “डिटेन्शन कॅम्प’ तयार करत आहेत, असे मत कुरेशी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले होते.
या देशातील मुस्लिमांनीही गेल्या 1,200 वर्षांमध्ये या देशासाठी त्याग केला आहे. देशाचे प्रथम स्वातंत्र्ययुद्ध असलेल्या 1857 च्या बंडामध्ये अनेक मुस्लिमांनी हौतात्म्य पत्करले होते, असे ते म्हणाले.