मुंबई – शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे अडसूळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार भावना गवळी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना आता आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले आहे.
सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने अडसुळ यांना समन्स पाठवले आहे.
‘सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांचे खाते होते. जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी एफआयआर झाले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी केली नव्हती’, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.
सीटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अडसूळ यांनी फेटाळून लावला आहे. सीटी बँकेत ८०० कोटींची उलाढाल होती. मग, ९८० कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो? असा सवाल उपस्थित करत, सकाळीच ईडीचे अधिकारी माझ्या घरी आलेत. त्यांनी मला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती अडसूळ यांनी दिली.