नवी दिल्ली – निवृत्त आयपीएस अधिकारी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात एनएसजीचे माजी महासंचालक जे. के. दत्त यांचे आज निधन झाले. करोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्यासंबंधी समस्यांमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्लीमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. जे. के. दत्त हे पश्चिम बंगाल केडरमधील आयपीएस अधिकारी होते.
जे. के. दत्त यांनी सीबीआय तसेच सीआयएसएफमध्ये अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अनेक पदांवर काम केले होते. सीबीआयमध्ये असताना जे. के. दत्त यांनी अनेक महत्वाची प्रकरणे हाताळली होती. जे. के. दत्त यांनी दिल्ली विद्यापीठातून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
त्यांना पोलीस शौर्य पदक, गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक आणि विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले होते. मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्यात त्यांनी दहशतवाद्यांशी लढा देताना नेतृत्व करत महत्त्वाची कामगिरी निभावली होती.