नेवासा – तालुक्याचे झुंजार विरोधक, अभ्यासू आणि लढवय्या नेता असलेले माजी आमदार आणि माजी खासदार तुकाराम गडाख ( Tukaram Gadakh ) यांचे हदयविकाराच्या त्रिव झटक्याने निधन झाले. गडाख यांचे वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या राहत्या घराच्या जवळील शेतात हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत साश्रूनयनांनी गडाख यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवारी (दि. २) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना नगरला तात्काळ उपचारार्थ नेण्यात आले. मात्र, रात्री बारा-साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पानसवाडी येथील त्यांच्या राहत्या घराजवळ असलेल्या शेतामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी त्यांचे बंधू किसन गडाख, पाच बहिणी, एक मुलगा रविराज, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
माजी खासदार तुकाराम गडाखांनी त्यांच्या राजकीय जीवनात कडवट असा संघर्ष केला. धर्मग्रंथांच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी अध्यात्मिक तत्वज्ञानाचंही प्रबोधन लोकांना केले. सत्ताधाऱ्यांना ‘पळता भुई थोडी’ करणारे माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचा धाडसी स्वभाव व कार्यकर्त्यांना सांभाळण्याची मोठी ताकद त्यांच्यात असल्याने जीवाभावाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे होते.
त्यामुळे राजकारणात तुकाराम गडाख यांचे नाव समोर आले की भल्या भल्यांची बोलतीच बंद होत होती. त्यांना “भाऊ”या आदरयुक्त नावाने ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने राजकारणातील तुफानी व्यक्तीमत्व हरपले आहे. गडाख यांच्या निधनाने कार्यकर्त्यांना जीव लावणारा लढवय्या नेता हरपल्याची जनभावना यावेळी श्रद्धांजली वाहणाऱ्या कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिकांनी बोलतांना व्यक्त केली.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाजवळ बसून शोक व्यक्त केला. अंत्यसंस्कार प्रसंगी हभप बाळकृष्ण महाराज सुडके, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजप नेते अभय आगरकर, युवा नेते उदयनदादा गडाख उपस्थित होते.
त्याचबरोबर युवा नेते सचिन देसरडा, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, माजी सभापती कारभारी जावळे, रासपचे नेते संतोष काळे सर, भिवाजी आघाव, शिवसेनेचे डॉ.रामनाथ बडे, मार्केट कमिटीचे माजी सभापती शंकरराव लोखंडे, भगवान गंगावणे, इंजिनियर सुनीलराव वाघ, अण्णासाहेब जावळे, दिलीपराव मोटे, दिलीप पवार, जेष्ठ सहकारी अशोकराव बोरा, शिवसेनेचे(शिंदे गट)तालुकाध्यक्ष सुरेशराव डिके, ठाकरे गट शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के, व्यापारी देविदास साळुंके, नानासाहेब अंबाडे, सुभाष राख, रमेश जाधव यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.