नाशिक – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काल एका पत्रकार परिषदेत शिंदे गटातील खासदार हेमंत गोडसे यांना उद्देशून काही खडे बोल सुनावले होते. त्यावर आज हेमंत गोडसे यांनीही एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
हेमंत गोडसे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. त्यांचे राजकीय करिअर आता संपले आहे. त्यांनी आता पुन्हा नाशिकमधून निवडून येऊन दाखवावे अशी भाषा संजय राऊत यांनी वापरली होती. हेमंत गोडसे यांनी स्वतःच आपली कबर खोदली आहे, असे ते म्हणाले. खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटात गेल्याने नाशिकमध्ये शिवसेनेचा लोकसभेचा चेहरा कोण असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले होते.
आज हेमंत गोडसे यांनीही एक पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांचा समाचार घेतला. राऊत यांनी नाशकात येऊन आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान त्यांनी दिले. संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात करीत आहेत. त्यांच्यामुळेच शिवसेनेचे वाटोळे झाले. संजय राऊत यांच्या चेहऱ्यामुळे राजकारणाचीच प्रतिमा मलिन होत आहे असे गोडसे यांनी म्हटले आहे.