दोन दिवसांत काम सुरू न केल्यास अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा
हडपसर – हडपसर विधानसभा मतदार संघातील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुरू केलेली कामे सध्या बंद करण्यात आली आहेत. ही कामे आमदार आणि मूलभूत सोयी सुविधा विकास निधी 2018-19 व 25 /15 ची मंजूर व वर्क ऑर्डर झालेली कामे आचारसंहिता संपून 2 महिने झाले तरी चालू केली नाहीत. केवळ स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दबावाला बळी पडत प्रशासनाने ही कामे बंद केली आहेत, असा आरोप करत आज हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी तीव्र आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय देशपांडे यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले.
यावेळी नगरसेवक विरसेन जगताप, जितेंद्र भंडारी, संदीप लोणकर, डॉ. दादा कोद्रे, पोपटराव वाडकर, इम्तियाज मोमीन, गणेश घुले, सुनील धुमाळ, संजय सातव, अतुल तरवडे, मदन शिंदे, प्रमोद सातव, हनुमंत घुले आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगेश टिळेकर यावेळी म्हणाले की, हडपसर विधानसभा मतदार संघात निवडणूक होण्यापूर्वी मंजूर झालेली तसेच ज्या कामांची वर्क ऑर्डर झालेली आहे. अशी रस्ते, सीमाभिंत, दशक्रिया विधी घाट, उद्यान, क्रीडांगण अशी विकास कामे प्रशासनाने जाणीव पूर्वक बंद केली आहेत. त्यामुळे आपण हे आंदोलन केले आहे. अधिकाऱ्यांनी ही विकास काम येत्या दोन दिवसांत सुरू केली नाहीत, तर संबंधित अधिकारी वर्गाला रस्त्यावर फिरू देणार नाही. विकास कामे करताना राजकारण करू नये अधिकारी राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सध्या राज्यात आलेले सरकार हे स्थगिती सरकार आहे.मात्र जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि मतदार संघातील विकास कामांसाठी आपण नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करू. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देशपांडे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर कार्यालयाचे टाळे काढण्यात आले.
चोवीस तासात कामे सुरू होतील – धनंजय देशपांडे
शासनाने विशेष निधी आणि ग्रामविकास निधीच्या कामांना स्थगिती दिली आहे. या व्यतिरिक्त असलेली हडपसर विधानसभा मतदार संघात जी कामे मंजूर असून ज्या कामांची वर्क ऑर्डर झाली आहे. ती कामे पुढील चोवीस तासांत सुरू करण्यात येतील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी दिले.
Very nice ……well done
Aap aage badho….hum aapke sath hai