नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू महंमद अझहरूद्दीन (Mohammad Azharuddin) हे तेलंगणातील निवडणुकीत (Telangana assembly elections) कॉंग्रेसच्यावतीने शहरातील ज्युबली हिल्स विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एआयएमआयएमने (MIM) तेथे उमेदवार उभा केल्याची मला चिंता नाही, मतदारसंघातील लोक आपल्याच सोबत आहेत असा दावा त्यांनी केला आहे. (Telangana Election)
या मतदार संघात एमआयएमने उमेदवार उभा केल्याने अल्पसंख्याकांच्या मतात फूट पडू शकते आणि त्याचा अझहरूद्दीनला फटका बसू शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. बीआरएसने (BRS) विद्यमान आमदार एम गोपीनाथ (M Gopinath) यांना तेथे उमेदवार म्हणून उभे केले आहे.
अझहरूद्दीन म्हणाले की, आम्ही आमची निवडणूक लढवत आहोत. कोण काय करत आहे याची आम्हाला चिंता नाही. मी स्वतःची निवडणूक लढत आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि मला माहित आहे की ज्युबली हिल्सचे लोक माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत असे अझरुद्दीनने पीटीआयला सांगितले.
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात असामाजिक घटक फोफावण्याशिवाय कोणताही विकास झालेला नाही. आगामी निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष बहुमत मिळवून तेलंगणात सरकार स्थापन करेल, असेही ते म्हणाले.अझहरूद्दीन येथे घरोघरी जाऊन प्रचार करीत आहे. त्यांना प्रचारात चांगले समर्थन मिळत आहे. अझरुद्दीनने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि 2009 मध्ये यूपीमधील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होते.सध्या ते तेलंगणाच्या प्रदेश कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांपैकी एक आहेत.