नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. याआधी जानेवारी महिन्यात त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
76 वर्षीय सोनिया गांधी यांना गुरुवारी ताप आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, असे सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने सांगितले.
दरम्यान, कॉंग्रेसचे 85वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच रायपूर येथे पार पडले. या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी केलेल्या भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधले. राहुल गांधींच्या “भारत जोडो’ यात्रे दरम्यान माझी अध्यक्षपदाची इनिंग संपली, ही फार समाधानाची बाब ठरली, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या निवृत्तीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.