मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा संघातील प्रवेश सोपा नव्हता. त्यच्या समावेशासाठी तसेच त्याच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यासाठी तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीचे मन वळवावे लागले, असा खुलासा भारताचे माजी कसोटीपटू व तत्कालीन निवड समितीचे अध्यक्ष किरण मोरे यांनी केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी धोनीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीमुळे दबदबा निर्माण केला होता. मात्र, तरीही धोनीला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. धोनीला संघात घेण्यासाठी तब्बल दहा दिवस चर्चा करून गांगुलीचे मन वळवले. त्यावेळी संघाला फलंदाजीही करू शकेल, असा यष्टीरक्षक संघात हवा होता.गांगुली मात्र राहुल द्रविडवरच ही जबाबदारी देण्यास इच्छुक होता. मात्र, गांगुलीचे मन वळवण्यात मला यश आले व धोनीचे पदार्पण झाले, असेही मोरे यांनी सांगितले.
दीप दासगुप्ता, अजय रात्रा, पार्थिव पटेल व दिनेश कार्तिक यांनाही सातत्याने संधी दिली गेली होती. मात्र, त्यांच्या कामगिरीवर आम्ही समाधानी नव्हतो. यापैकी कोणालाही संघात कायमस्वरूपी स्थान मिळवता आले नाही. द्रविड एकदिवसीय सामन्यांत यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडत होता. मात्र, दीर्घकालीन योजनेसाठी ते पुरेसे नव्हते. त्यावेळी आम्ही हिटर शोधत होतो जो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर येऊन आक्रमक फलंदाजी करू शकेल. धोनीपाशी येऊन आमचा शोध संपला, असेही मोरे म्हणाले.
2004 साली दुलीप करंडक स्पर्धेचा अंतिम सामना उत्तर व पूर्व विभाग यांच्यात खेळला गेला. त्यात माझ्या सहकारी सदस्याने धोनीची फलंदाजी पाहिली. नंतर त्याने ही गोष्ट मला कळवली व मीदेखील त्याची फलंदाजी पाहण्यासाठी गेलो. धोनीने त्या सामन्यात 130 धावांची खेळी केली. त्यानंतर भारतीय संघाच्या एका सामन्यादरम्यान गांगुली व तत्कालीन यष्टीरक्षक दीपदास यांच्याशी माझे धोनीच्या शिफारशीवरून वादही झाले. दीपदास याच्या जागी धोनीला संधी द्यावी, यासाठी गागुली व अन्य निवड समितीच्या सदस्यांचे मन वळवण्यासाठी मला दहा दिवस खर्ची घालावे लागले, असेही मोरे यांनी सांगितले.
धोनीने गुणवत्ता सिद्ध केली
भारतीय संघाचा तत्कालीन प्रमुख वेगवान गोलंदाज आशिष नेहरासह जवळपास सर्व गोलंदाजांसमोर धोनीने भरपूर धावा केल्या. त्यानंतर आम्ही त्याला भारत अ संघाबरोबर केनियाच्या दौऱ्यावर रवाना केले. तिथेही त्याने धावांची रास रचली. त्याने गुणवत्ता सिद्ध केली व गांगुलीचाही विरोध मावळला. त्याचक्षणी भारतीय संघाला बेस्ट फिनिशर गवसला, असे मोरे यांनी नमूद केले.