ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या माजी सचिवाला अटक

अर्थ तत्व चिटफंड प्रकरणी झाली कारवाई

नवी दिल्ली – ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव आशीर्वाद बेहेरा यांना सीबीआयने अटक केली आहे. अर्थ तत्व चिटफंड प्रकरणी त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी बेहेरा यांच्यासोबत हॉटेल मालिक कमलाकांत दास यांना देखील सीबीआयने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सीबीआयच्या टीमने आशीर्वाद बेहेरा यांच्या घरावर छापा टाकत त्यांना अटक केली. आशीर्वाद यांच्या नावावर सीबीआयने आधीच चार्जशीट दाखल केली होती.

चिटफंड प्रकरणात विशेष न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटच्या आधारे सीबीआयने बेहेरा यांना अटक केली आहे. सीबीआयने 27 ऑगस्ट रोजी एक आरोपपत्र दाखल केले होते. आशिर्वाद बेहेरा यांच्यासोबत आणखी दोन जणांविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये खारवेलनगर येथील हॉटेल सोलान इनरचे मालक कमलाकांत दास आणि संबित खुंटिया यांचा समावेश आहे.

आशीर्वाद बेहरा ओडिशा ऑलिम्पिक संघाचे सचिव होते. बेहरा यांच्या बाराबटी स्टेडिअम येथील कार्यालयावर 16 ऑगस्ट 2014 रोजी सीबीआयने छापा टाकला होता. ईडीने बेहेराच्या जावयाला देखील याप्रकरणी समन्स बजावले आहे. दरम्यान, ओडिशातील सर्वच क्रीडा संघावर बेहरा यांचे वर्चस्व होते. बाराबटी स्टेडिअम जमीन घोटाळा प्रकरण समोर आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने बेहरा यांना पद सोडण्यास सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.