आशियाई टेबल टेनिस स्पर्धा; शरथ कमाल व साथियन उपांत्यपूर्व फेरीत

 नवी दिल्ली: भारताच्या अचंता शरथ कमाल व जी. साथियन यांनी आशियाई टेबल टेनिस स्पर्धेतील पुरूषांच्या दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ही स्पर्धा योग्यकार्ता (इंडोनेशिया) येथे सुरू आहे.

भारताच्या या जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. दुसऱ्या फेरीत त्यांनी जॉर्डनच्या यमान झैद व अल्मेदीझी झायेद यांचा 11-4, 11-7, 11-7 असा सरळ तीन गेम्समध्ये पराभव केला. पाठोपाठ त्यांनी सईद मूर्तधी व रशीद खान यांच्यावर 11-8, 11-6, 11-3 असा विजय मिळविला. कमाल व साथियन यांना उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या लियांग जिंगकुन व लिन गाओयुआन यांच्याशी गाठ पडणार आहे. भारताच्या हरमित देसाई व अँथोनी अंमलराज यांना चीन तैपेईच्या लिऊ हिसिंग यिन व पेंगवांग वेई यांच्याकडून 11-5, 7-11, 11-3, 8-11, 6-11 असा पराभव पत्करावा लागला.

महिलांमध्ये भारताच्या मनिका बत्रा व अर्चना कामत यांचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. त्यांना कोरियाच्या यांग हेयुन व जिओन जेही यांनी 11-6, 11-9, 11-7 असे हरविले. माधुरिका पाटकर व सुतिर्था मुखर्जी यांना हॉंगकॉंगच्या दोहोई किम व लिहो चिंग यांनी 11-9, 11-5, 13-11 असे पराभूत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.