आंध्राचे माजी मुख्यमंत्री एन. भास्कर राव भाजपात

हैदराबाद – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. भास्कर राव यांनी भाजपात प्रवेश केला. ते अनेक दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र पुन्हा एकदा त्यांनी नवी इनिंग सुरु केली आहे. त्यांच्यासोबत अनेक माजी मंत्र्यांनी आणि माजी खासदारांनीही भाजपात प्रवेश केला. दरम्यान, भाजपने दक्षिणेत पक्ष वाढवण्यासाठी जोर लावला आहे.

भास्कर राव हे 1984 मध्ये एका महिन्यासाठी मुख्यमंत्री झाले होते. तेलगू देसम पक्षाचे संस्थापक एन. टी. रामा राव यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री असताना त्यांनी तख्तापालट केला होता. यानंतर भास्कर राव यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.

भास्कर राव यांच्यासोबतच माजी मंत्री पेद्दी रेड्डी, माजी खासदार राममोहन रेड्डी, सुरेश रेड्डी, माजी आमदार शशीधर रेड्डी, सिनेमानिर्माता बेलमकोंडा रमेश, निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रदान आणि अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्व नेत्यांचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षात स्वागत केले.

दरम्यान, पश्‍चिम बंगालमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपने आता दक्षिणेत लक्ष केंद्रीत केले आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त दक्षिण भारतातूनच कमी जागा मिळाल्या. केरळ, आंध्र प्रदेश तामिळनाडूमध्ये भाजपचा सुपडासाफ झाला होता. त्यामुळे भाजपने आत्तापासूनच 2024ची तयारी सुरु केल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.