नगर -शहरासह उपनगर भागातील बचत गटाच्या महिलांनी खाजगी फायनान्सकडून कर्ज घेतले आहे. लॉकडाऊन काळात उत्पन्नाचे साधन नसल्याने कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी खाजगी फायनान्सवाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दमबाजी करीत आहेत. या खाजगी फायनान्स धारकांवर गुन्हे दाखल करावे व लॉकडाऊन काळातील व त्यापुढील तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा शहर संघटक मतीन सय्यद, फातेमा शेख, अनिता पाचरणे, कल्पना सोनवणे, रीना पल्ले, आशा बांगडी, मनिषा भोसले, शाहीन शेख आदिंसह विविध बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. शहरासह भिंगार, आलमगीर, मुकुंदनगर, केडगाव, सावेडी, एमआयडीसी मधील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून खाजगी फायनान्स कडून विविध व्यवसायासाठी कर्ज घेतले होते.
मात्र, लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने तीन महिन्यांचे हप्ते भरण्यात आलेले नाही. सध्या अनेक व्यवसाय व उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली असली तरी सर्व व्यवसायामध्ये मंदिचे सावट आहे. त्यामुळे खाजगी फायनान्सवाले हप्ते वसूल करण्यासाठी महिलांकडे तगादा लावत आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करून, सहा महिन्यांचे कर्जाचे हप्ते माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी युवकतर्फे करण्यात आली आहे.