लोणी काळभोर येथील घटना ः चोरट्यांनी केली वस्तूंची तोडफोड
लोणी काळभोर -चोरट्यांनी येथील वनखात्याच्या कार्यालयाचा दरवाजा तोडून आतप्रवेश केला आणि वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले आहे. तसेच 2 हजार रुपये किमतीचा जप्ती शिक्का चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी वनरक्षक बळीराम शेषराव वायकर (वय 47, रा. थेऊर, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञातांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर गावात वनखाते गट नंबर 8 मध्ये वन अधिकारी व कर्मचारी यांचे कार्यालय व निवासस्थान आहे. या ठिकाणी तुळशीराम विठ्ठल कोंढारे (रा. कोंडेवस्ती, लोणी काळभोर) हे वनमजूर म्हणून काम करतात. बुधवारी (4 मार्च) रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालय बंद केले होते. 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ते कार्यालय उघडण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना लाकडी दरवाजा कोणीतरी तोडलेला दिसला. त्यांनी बाब वनरक्षक बळीराम वायकर यांना कळवली.
वायकर व वनपाल यादव उत्तमराव जाधव असे दोघेजण तेथे पोहोचले व पाहणी केली असता त्यांना पाठीमागील लाकडी दरवाजा कोणीतरी तोडलेला दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्यांना कार्यालयातील सर्व साहित्य, कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच पाण्याची प्लॅस्टिकची टाकी व पाइपलाइन फोडलेली दिसली आणि टेबलमधील जप्ती शिक्का दिसला नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र चांदणे करीत आहेत.