महापौरांनीही चाखली “कष्टाच्या भाकरी’ची चव

स्वारगेट येथील केंद्राचे स्थलांतर व नूतनीकरण
पुणे – पन्नास वर्ष सातत्याने स्वस्त व सकस आहार सेवा देणे हे अतिशय अवघड काम डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात हमाल पंचायतीने शक्‍य करून दाखविले आहे. कष्टाची भाकरसारखे उपक्रम हे शहराचे वैभव असून अशा उपक्रमांच्या पाठीशी शहराची पालक संस्था म्हणून पुणे महापालिका सदैव खंबीरपणे उभी आहे, अशा शब्दात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी “कष्टाची भाकर’ योजनेचे कौतुक करीत स्वत:ही या केंद्रात भाकरी-भाजीची चव चाखली.

स्वारगेट येथील कष्टाची भाकर केंद्र मेट्रोच्या कामासाठी हलवण्यात आले होते. स्थलांतरित व नूतनीकरण केलेल्या केशवराव जेधे चौकातील या केंद्राचे उद्‌घाटन गुरुवारी (दि.5) महापौरांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबा आढाव होते. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धिरज घाटे, कसबा क्षेत्रीय अध्यक्ष स्मिता वस्ते, महा मेट्रोचे अधिकारी भिवाजी पऱ्हाड, प्रतीक जैन, वसंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार, पंचायतीचे उपाध्यक्ष गोरख मेंगडे, सोपान धायगुडे, सरचिटणीस नवनाथ बिनवडे, खजिनदार चंद्रकांत मानकर तसेच मित्र संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी अनोख्या पद्धतीने केंद्राचे उद्‌घाटन झाले. केंद्राच्या प्रवेशद्वारात उद्‌घाटनाची फित मध्यभागी भाकरीच्या चित्राने जोडली होती, ही भाकरी मोडून केंद्राचे उद्‌घाटन झाले. तसेच, महापौरांनी कष्टाच्या भाकरीचा आस्वादही घेतला. तसेच काच पत्रा वेचक सुमन मोरे यांना पदार्थ वाढून या केंद्रातील सेवेला सुरुवात केली.

यावेळी डॉ. आढाव म्हणाले की, अधिकारी बदलला की धोरणे बदलतात. तीन वर्षांसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना शहराची येथील, समाज, संस्कृती, लोकांचे जगण याची तपशिलात माहिती नसते. ते धोरणे ठरवतात. त्याचा अमल करायला सुरुवात झाली की, त्यांची बदली होत असते, अशा अवस्थेत येथील कष्टकरी गरीब वर्गाची आगीतून फुफाट्यात अशी अवस्था होते. अशा परिस्थितीत भाकरचे हे 11वे केंद्र लोकांच्या सेवेत रुजू होत आहे. मेट्रोचे काम सुरू झाले. विस्थापने झाली. मात्र, कष्टाच्या भाकरची त्यांनी कदर ठेवली. योग्य पर्यायी जागा दिली, अशा शब्दांत त्यांनी महापालिकेचे आभार मानले. यावेळी नितीन पवार यांनी मनोगत व्यक्‍त केले. पंचायतीचे व्यवस्थापक हुसेन पठाण यांनी सूत्रसंचालन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.