पुणे – वनविभागांतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी भरतीची गरज सातत्याने व्यक्त केली जात होती. राज्यात विविध ठिकाणी सातत्याने होणाऱ्या वन्यजीव-मानव संघर्षप्रकरणी ही बाब प्रकर्षाने जाणवत होती. या मागणीची दखल घेत वनविभागाने पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करत, भरती प्रक्रियेसाठीचा मार्ग मोकळा केला आहे.
विभागातर्फे वनमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 14) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान पशु वैद्यकीय अधिकारी गट “अ’, सहायक आयुक्त पशुसंवर्धन (वन्यजीव) गट “अ’ आणि उपायुक्त पशुसंवर्धन (वन्यजीव) गट “अ’ या पदाचे कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित केल्या. त्यामुळे वन विभागात या अधिकाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामुळे लवकरच विभागांतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी भरती केली जाईल, जेणेकरून भविष्यात वन्यप्राण्यांची देखभाल करण्यासाठी तसेच नागरी आणि वन्य क्षेत्रातील बचाव मोहिमेदरम्यान तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध होण्यास मदत मिळेल, अशी माहिती वनमंत्री राठोड यांनी दिली.