मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार व राज्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी आता लवकरच पोलीस चौकशीस सुरुवात होणार आहे. मात्र अशातच आता एका भाजप नेत्याने रेणू शर्मा यांच्याविरोधात गंभीर आरोप करत कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना एक पत्र लिहलं असून यापत्राद्वारे त्यांनी, ‘रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.’ असे गंभीर आरोप केले आहेत.
कृष्णा हेगडे यांनी पत्राद्वारे केलेले आरोप
कृष्णा हेगडे यांनी पत्रात ‘मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी,’ असं म्हंटलं आहे.
“तिने चार ते पाच वर्ष माझा पाठलाग केला. तिला तिच्या म्युझिक व्हिडिओसाठी पैसे हवे होते. म्हणून ती मागे लागली होती. सहा जानेवारीला २०२१ ला तिचा अखेरचा मेसेज आला. ‘तुम्ही मला विसरलात का?’ असे तिने म्हटले होते.” असेही कृष्णा हेगडे यांनी पत्रामध्ये म्हंटले आहे.
“काही दिवसातच धनंजय मुंडे यांचे प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे यांनी त्यांना ती महिला ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले. रेणू शर्मा सारखे जे लोक ब्लॅकमेल करतात, त्यांचा भांडाफोड झाला पाहिजे, सत्य समोर आले पाहिजे म्हणून मी आज तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आलो” असंही त्यांनी स्पष्ट केला.