मुंबई – बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी गेल्या दिवशी चोरी झाली होती, ज्याची बातमी ऐकून सगळेच अस्वस्थ झाले होते. चित्रपटसृष्टीतील लोकांमध्ये चोरीच्या वाढत्या घटना सर्वांनाच सतावत आहेत. सोनू निगमच्या वडिलांच्या आधी सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याच्या घरातून लाखोंचे दागिने चोरीला गेले होते.
मात्र, ते प्रकरण आता मिटले असून सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आलं आहे. अवघ्या दोनच दिवसांत मुंबई पोलिसांनी लाखोंच्या चोरीचं गूढ उलघडलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आगम कुमार निगम यांच्या ड्रायव्हरला म्हणजेच आरोपी ‘रेहान’ला कोल्हापुरातून अटक केली असून त्याच्याकडून चोरीचे 70 लाख रुपयेदेखील जप्त केले आहेत.
विशेष म्हणजे आगम निगमच्या घरातून 72 लाखांची चोरी झाली होती, त्यानंतर त्यांनी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सोनू निगमच्या वडिलांनी आधीच पोलिसांना सांगितले होते की, “त्यांचा ड्रायव्हर म्हणून काम करणार्या रेहानवर त्यांचा संशय होता. रेहान डुप्लिकेट चावीने फ्लॅटमध्ये घुसला आणि बेडरूममधील डिजिटल लॉकरमधून 72 लाख रुपये चोरल्याचा’ सोनू निगमच्या वडिलांना संशय आहे.
दरम्यान, या तक्रारीनंतर पोलिसांनी ड्रॉयव्हरचा शोध सुरु केला आणि दोन दिवसांच्या शोधानंतर त्याला कोल्हापुरातून अटक केली आहे. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली असून त्याच्या माहितीवरुन पोलिसांनी कोल्हापुरातून चोरीस गेलेला 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या आरोपी रेहान पोलिसांच्या ताब्यात असून, त्याची अधिक चौकशी पोलीस अधिकारी करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.