एक लाख 37 हजारांचा ऐवज घेऊन चोराचा पोबारा : परिसरात दहशत
संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे रविवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत स्वरुपचंद मार्केटला लक्ष्य करुन तीन ठिकाणी, आश्वी-प्रतापपूर रस्त्यावर दोन ठिकाणी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अतंरावर असलेले दोन बंद बगले, अशा एकूण आठ ठिकाणी चोऱ्या करुन एक लाख 37 हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना घडली.
आश्वी बुद्रुक-प्रतापपूर रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर स्वरूपचंद गांधी मार्केटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहात असलेले प्राथमिक शिक्षक सचिन हरिभाऊ डहाळे यांच्या बंद घराचे कुलुप तोडून 10 हजार रोख व एक तोळे सोन्याचे दागिने, विकास रामनाथ वर्पे यांचे पाच हजार रोख व 27 हजारांचे सोने व तिसऱ्या मजल्यावर राहात असलेल्या संदीप श्रीरंग क्षिरसागर यांच्या घरातून 55 हजारांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. यावेळी चोरट्यांनी चोरीला अडथळा होऊ नये, यासाठी शेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावून घेतल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
विशेष म्हणजे आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर व सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे सुध्दा याच सोसायटीत वास्तव्यास असल्याने चोरट्यांनी जणू पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
चोरट्यांनी आश्वी-प्रतापपूर रस्त्याच्या कडेलाच राहात असलेल्या सुलोचना रमेश पाडंव यांच्या घरातून रोख 30 हजार रुपये व अन्य एका बंद घराचे कुलूप तोडले. तसेच आश्वी बुद्रुक बाजारतळा लगत व पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन ठिकाणी चोरट्यांनी धुडगूस घातला असून, याबाबत चोरीला गेलेल्या मुद्देमालाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.