विनयभंगास प्रतिकार करताना घडली घटना : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा
लोणी काळभोर – पिकअप गाडीवरील अज्ञात चालकाने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्रतिकार करून गाडीचा दरवाजा उघडून ही महिलेने चालत्या गाडीतून उडी मारल्याने ती जखमी झाली. ही घटना आज सकाळी सोलापूर-पुणे महामार्गावर घडली आहे.
याप्रकरणी 30 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला ऊरूळी कांचन परिसरात रहात असून मजुरी करून आपल्या दोन मुलांना सांभाळते.
रविवारी (दि. 15) रोजी नेहमीप्रमाणे ती हडपसर परिसरात मजुरीचे काम करण्यासाठी निघाली होती. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ती सोलापूर-पुणे महामार्गावर कामावर जाण्यासाठी वाहनाची वाट पहात असताना सोलापूर बाजुकडून एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी आली.
तिने त्या गाडीला हात केला. गाडी थांबल्यानंतर ती गाडीत बसली. गाडीत पॅन्ट शर्ट व जर्किंग घातलेला चालक एकटाच होता. त्याने गाडी सुरू केली. गाडी बोरकर वस्ती येथील जिजाऊ मंगल कार्यालयसमोर आल्यावर चालकाने डावा हात धरून पीडितेला जवळ ओढले. तेव्हा तिने मोठमोठ्याने आरडा-ओरडा केला. त्याने गाडी थांबवली नाही म्हणून तिने गाडीचा दरवाजा उघडून चालत्या गाडीतून उडी मारली. त्यामुळे तिचे हात, तोंड व पोटाला खरचटल्याने लहान मोठ्या जखमा झाल्या.
महिला गाडीतून पडल्याचे लक्षात येताच तेथे जमलेल्या लोकांनी तिला उपचारासाठी लोणी स्टेशन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार घेतल्यानंतर पीडित महिलेने अज्ञात पिकअप गाडीवरील अज्ञात चालकाविरुद्ध हात धरून मला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे.