हाफिज सईदच्या अटकेसाठी आम्ही पाकवर दोन वर्ष दबाव टाकला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

न्युयॉर्क : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्‍या हाफिज सईदला अखेर पाकिस्तानने अटक केली. दरम्यान, पाकिस्तानच्या या कारवाईवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सईदच्या अटकेसाठी आम्ही पाकिस्तानवर मागच्या दोन वर्षापासून प्रचंड दबाव टाकला होता असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, मागच्या दहा वर्षापासून सईदवर कारवाई करण्यासाठी भारताने पाकिस्तानला वेळोवेळी सांगितले होते मात्र, त्याकडे पाकने पुर्णपणे दुर्लक्ष केले होते. अखेर बुधवारी पाकिस्तानने सईदला बेड्या ठोकल्या.

हाफिज सईदची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. लाहोरवरून गुजरानला जात असताना सईदला अटक करण्यात आली. पाकिस्तानात दहशतवादाविरोधात काम करणारी सरकारी संस्था काऊंटर टेरेरिझम डिपार्टमेंटने ही कारवाई केली आहे. सीटीडीने 3 जुलै रोजी हाफिज सईदसह त्याच्या 13 जमात उद दावाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले होते. दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणी अखेर सईदवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.