मुंबई – रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटासाठी रणबीर खूप मेहनत घेत आहे. चित्रपटात रामाची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूर त्याच्या जीवनशैलीत खूप बदल करत आहेत. रणबीरने दारू आणि मांस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रामाची भूमिका साकरण्यासाठी त्याने अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. सध्या त्याने घेतलेल्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.
एका वृत्तानुसार, रणबीर दारू पिणे सोडत आहे. याशिवाय रामाच्या पात्राला न्याय देण्यासाठी नॉनव्हेज खाणेही बंद करत आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाचे शूटिंग सुरू होईपर्यंत रणबीर दारू आणि मांसाहारापासून पूर्णपणे दूर राहिला असेल. इतकेच काय तर तो रणबीर लेट नाईट पार्टीही करत नाही. रामाची पवित्र भूमिका साकरण्यासाठी तो अनेक बदल करत आहे.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारणार आहे, तर दक्षिण अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे. आलिया भट्ट माता सीतेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा याआधी होती, परंतु तारखेच्या वादामुळे आलियाने चित्रपटाला नकार दिल्याचे म्हंटले जात आहे.
आता निर्मात्यांनी साई पल्लवीला कास्ट केले आहे. निर्मात्यांनी रावणासाठी अभिनेत्याची देखील निवड केली आहे आणि रिपोर्टनुसार, साऊथचा सुपरस्टार यश या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे. रामायण चित्रपटा व्यतिरिक्त रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.