फलटण – विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व आ. दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून फलटण शहरातील विकासकामांसाठी सात कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून प्रामुख्याने भडकमकरनगरात महिलांकरिता बहुउद्देशीय हॉल आणि मध्यवर्ती ठिकाणी फुडमॉल होणार आहे, अशी माहिती फलटण बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटणमधील विकासकामांसाठी आ. रामराजे यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत पाच कोटी, तर महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत जिल्हा नियोजन समितीमार्फत दोन कोटी 39 लाख 84 हजार रुपयांचा निधी पालिकेस मंजूर करण्यात आला आहे.
रघुनाथराजे व संजीवराजे म्हणाले, नगरोत्थान महाअभियानांतर्गत भडकमकरनगरात महिलांसाठी बहुउद्देशीय हॉल बांधण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नगरविकास विभागाकडून दि. 25 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरात महात्मा फुले शॉपिंग सेंटरलगत फुडमॉल विकसित करण्यासाठी दोन कोटी, दत्तनगर शिंदे इमारत ते दगडी पूल ते हनुमान मंदिर ते वेलणकर दत्त मंदिर बंदिस्त नाल्यासाठी एक कोटी 95 लाख, पद्मावतीनगरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 90 लाख रुपये, प्रभाग 11 मधील खुशी अपार्टमेंट ते जाधव घरापर्यंत रस्त्यासाठी 15 लाख रुपये, असा निधी मंजूर झाला आहे.