मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
पिंपरी – कामगारांच्या प्रश्नांसाठी महापालिका, राज्य आणि केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करणार आहे. कंत्राटी कामगार पद्धतीच्या काही त्रुटी आहेत. त्या दूर करून कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध पातळ्यांवर चर्चा करणार आहे, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.
भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा राज्यस्तरीय कामगार प्रतिनिधी मेळावा पिंपरी येथे रविवारी (दि. 5) उत्साहात पार पडला. आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या या मेळाव्यात पाटील बोलत होते. खासदार गिरीश बापट, अमर साबळे, महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमित गोरखे, उमा खापरे, नगरसेविका सुजाता पालांडे, आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, महेश कुलकर्णी, प्रमोद निसळ, उषा मुंडे, माउली थोरात, संदीप खर्डेकर आणि राज्यभरातील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, महापालिकेतील सफाई कामगारांचे पैसे अनेक वर्षांपासून मिळालेले नाहीत. ते मिळण्यासाठी पुढील आठवड्यात महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार आहे.
बापट म्हणाले, कारखानदारांकडून कामगारांना दुर्लक्षित केले जाते. त्यामुळे कामगारांनी संघटित होऊन त्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत. कामगारांचे विविध प्रश्न भोसले यांनी या प्रसंगी मांडले. तसेच, त्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही दिले.