मुंबई – यंदाचे 2021 हे वर्ष संपण्यासाठी आता फक्त 6 दिवस उरले असून, या मावळत्या वर्षात देशाने अनेक धक्के पचवले आहेत. 2021 या वर्षात अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी जगाचा निरोप घेतला आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक आणि सिनेसृष्टीतील अश्या सर्वच व्यक्तींचा समावेश आहे.
भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत
भारताचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. कोईम्बतूर आणि सुलूर यादरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले होतं. या हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत देखील होत्या. त्यांचही या अपघातात निधन झालं आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ यांचे पुण्यात 15 नोव्हेंबर रोजी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
अभिनेते दिलीप कुमार
बॉलिवूडचा महान अभिनेता आणि ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले ‘दिलीप कुमार’ यांनी 7 जुलै रोजी जगाला निरोप दिला. भारतीय चित्रपटसृष्टीला अभिनयाची वाट दाखवणारे “नटसम्राट’ पद्मविभूषण, दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी आपल्यातून निरोप घेतला.
अभिनेता पुनीत राजकुमार
साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले. पुनीत यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
अभिनेते घनश्याम नायक (नट्टू काका)
छोट्या पाड्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील अभिनेते घनश्याम नायक (नट्टू काका) यांचे निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.घनश्याम नायक यांना कर्करोगाचे निदान झाले होते. तेंव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि ते आपल्यातून निघून गेले.
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला
प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस 13 चे विजेता ‘सिद्धार्थ शुक्ला’चे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचे निधन झाले. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं. सिद्धार्थ फक्त 40 वर्षांचा होता. एवढ्या लहान वयात हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू होणे धक्कादायक आहे.