पुणे – भारतात यंदा ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेतील तब्बल पाच सामने यंदा पुण्याला मिळाले असून, त्यात 19 ऑक्टोबर रोजी भारताचा पुण्यातील एकमेव सामना बांगलादेशशी रंगणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली. सध्या पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रिमिअर लीगच्या समारोपानंतर गहुंजे स्टेडियमवर विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजनासाठी तयारी सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर हे पाच सामने खेळण्यात येणार आहेत. 30 नोव्हेंबरला अफगाणिस्तान आणि क्वालिफायर 2 हा सामना असेल, तर 1 नोव्हेंबरला न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना तसेच 8 नोव्हेंबरला इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर 1 सामनाही पुण्यातच होणार आहे.
बांगलादेशची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी पुण्यात 12 नोव्हेंबरला रंगणार आहे. पुण्यात तब्बल 27 वर्षांनंतर विश्वकरंडक स्पर्धेचा सामना होत आहे. 1996 सालच्या 29 फेब्रुवारीला वेस्ट इंडीज व केनिया यांच्यात पुण्यातील नेहरू स्टेडियमवर सामना झाला होता व त्यात केनियाने सनसनाटी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलिया व बांगलादेश यांच्यातील सामना वगळता बाकी चारही सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील. ऑस्ट्रेलिया व बांगलादेश यांच्यातील सामना सकाळी 10ः30 वाजता सुरू होणार आहे.
पुण्यात होणारे सामने
19 ऑक्टोबर – भारत वि. बांगलादेश, पुणे
30 ऑक्टोबर – अफगाणिस्तान वि. क्वालिफायर 2, पुणे
1 नोव्हेंबर – न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका, पुणे
8 नोव्हेंबर – इंग्लंड वि. क्वालिफायर 1, पुणे
12 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, पुणे