कुरवली – महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त पुणे जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव तसेच इतर संतांच्या पालख्या पायी पंढरपूरला जातात. आषाढी एकादशी वारीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कुरवली शाळेतील बाल वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे दिंडीमध्ये बाल वारकऱ्यांनी पालखी सोहळा सह वृक्षदिंडी आणि ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते.
समाजासाठी वृक्ष आणि ग्रंथ यांचे असलेले महत्व घोषणेतून तसेच फलक लेखनातून सांगितले. दिंडी ढोल ताशांच्या गजरामध्ये लेझीम पथकांच्या तालामध्ये टाळ मृदुंगांच्या तालामध्ये झाडे लावा झाडे जगवा, प्राणीमात्रांवर दया करा, घरोघरी वाचनालय असू द्या, वाचाल तर वाचाल, घरोघरी नवीन कपडे नसतील तरी चालतील पण नवीन पुस्तके असलीच पाहिजेत. वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. चला तर मग झाडे लावूया सजीव वाचूया चे फलक घेवून गावातून फेरी काढण्यात आली. गावातील मारुती मंदिरासमोर मुलांनी एकत्रित येत लेझीम पथकाने आणि टाळकऱ्यांनी रिंगण सोहळा साजरा केला.
दिंडीत विठ्ठल रुक्मिणी, संत वेषभूषेत मुले टाळकरी व विणेकरी अशा पारंपरिक वेशभूषेत मुले दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी गावातील महिला आणि ज्येष्ठ लोकांनी पालखीचे पूजन केले. पालखीमध्ये वृक्ष आणि ग्रंथ दिंडी पाहून सर्वांना या बाल वारकऱ्यांचे कौतुक केले. पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि पादुका ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती धावणे यांनी वृक्ष दिंडी पालखी सोहळा आणि ग्रंथ दिंडी यांच्य महत्त्व सांगतिले.
या दिंडी सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आयुबभाई सय्यद, उपाध्यक्ष दादासो पोपळभट्ट, सरपंच राहुल चव्हाण उपसरपंच मंदा चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती धावणे, सहशिक्षक भरत काकडे, विद्या गोसावी, पालक आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले. दिंडीच्या सोहळ्यासाठी इंदापूर तालुक्याचे गटविकासअधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी अंजिक्य खरात, कुरवली केंद्राचे केंद्रप्रमुख मारुती सुपुते यांचे मार्गदर्शन लाभले.