लोणंद – सातारा-फलटण रस्त्यावर लोणंद हद्दीतील निर्जन खिंडीत वाहनचालकांना लुटणारी टोळी लोणंद पोलिसांनी जेरबंद केली आहे. रामदास बापू काळे, पिंटू शहाजी काळे, दशरथ लक्ष्मण काळे, तानाजी अशोक काळे व सचिन अशोक काळे (सर्व रा. पाराता, वाशी, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून कोयता, लाकडी दांडके, मिरची पूड, नायलॉनची दोरी, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी रॉड अशी घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
सातारा-फलटण रस्त्यावर लोणंद हद्दीतील प्रसाद स्टोन क्रशरजवळील निर्जन खिंडीत काही दिवसांपासून ट्रकचालकांना लुटण्याच्या घटना घडत होत्या. रस्त्यावर लाल रंगाचा जॅक ठेवून वाहने थांबवायची आणि हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करायची, अशी पद्धत या टोळीने अवलंबली होती.
पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंदचे सपोनि संतोष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून टोळीच्या मागावर होते. पोलीस पथक रात्रगस्त घालून घडलेल्या घटनांबाबत माहिती घेत असताना, काल (दि. 11) रोजी रात्री सातारा-फलटण रस्त्यावर लाल जॅक टाकून जवळपास काही संशयित उभे असल्याचे समजले.
त्यानुसार, पोलिसांनी तेथे सापळा लावला. पोलिसांची चाहुल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी पाठलाग करून पाच जणांना पकडले. हे संशयित ऊसतोडणी मजुरांच्या टोळीचे सदस्य आहेत. ते दिवसभर ऊसतोड करून रात्री गुन्हे करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सपोनि संतोष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, हवालदार महेश सपकाळ, अविनाश नलावडे, विजय शिंदे, अविनाश शिंदे, गोविंद आंधळे, श्रीनाथ कदम, संतोष नाळे, सागर धेंडे, अभिजित घनवट, केतन लाळगे, फैयाज शेख, अमोल पवार, शशिकांत गार्डी, ज्ञानेश्वर साबळे, नाना होले, अनिल भोसले यांनी ही कारवाई केली. याबद्दल लोणंद पोलिसांचे कौतुक होत आहे.