नवी दिल्ली – दहावीच्या एका विद्यार्थ्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशच्या बापटला जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली.
उप्पल अमरनाथ असे त्या मुलाचे नाव आहे. आज सकाळी तो सायकलवर आपल्या शिकवणीला जात असताना चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला आणि अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. त्याचे विव्हळणे ऐकून स्थानिक लोक त्याच्या मदतीला धावले. त्यांनी त्याला तातडीने गुंटूर येथील रूग्णालयात नेले.
रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. रूग्णालयात नेले जात असताना जळीत मुलाने वेंकटेश्वरा रेड्डी या व्यक्तीचे नाव पोलिसांना सांगितल्याचे समजते.
नेमकी कोणत्या कारणामुळे या दहावीच्या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेपूर्वी उप्पलचे कोणाशी भांडण झाले होते का ? त्याच्यावर पेट्रोल ओतणारे कोण होते ? हे सारे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत.