पहिल्याच दिवशी 997 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया : मुंबईपेक्षा पुणे विभागात सर्वात जास्त अर्ज

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी 997 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. मुंबईपेक्षा पुणे विभागात सर्वात जास्त अर्ज भरण्यात आले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याची विद्यार्थी व पालकांना उत्सुकता लागली होती. शिक्षण विभागाने 9 झोनमध्ये मार्गदर्शन केंद्राची व्यवस्थाही सज्ज ठेवली आहे. दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या त्या शाळांमध्ये प्रवेशाची माहिती पुस्तिकाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी शाळा व मार्गदर्शन केंद्रांमध्ये अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी धाव घेतली. काही पालक व विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेत जावून अर्ज भरण्याचा पर्याय निवडल्याचेही चित्र पहायला मिळाले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्रासाठी एकूण 997 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. यातील 17 अर्जांची तपासणीही पूर्ण करण्यात आली असून ते पात्र ठरले आहेत. खुल्या वर्गातील व कोणतेही आरक्षण लागू नसलेल्या 384 विद्यार्थ्यांच्या अर्जांची संगणकाद्वारेच (ऑटो व्हेरिफाईड) आपोआपच तपासणी पूर्ण झाली असून ते ही पात्र ठरले आहेत. विविध आरक्षणातून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या 596 विद्यार्थ्यांच्या अर्जांची अद्याप तपासणी झालेली नाही, अशी माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्ष व पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवेशासाठी 603 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. यातील एका अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. 272 अर्जांची संगणकाद्वारेच तपासणी पूर्ण झाली आहे. 330 अर्जांची अद्याप तपासणी पूर्ण झालेली नाही.
सकाळी वेळेत संकेतस्थळ सुरु झाले आहे. यावर कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाली नसून त्याबाबत तक्रारीही विद्यार्थी अथवा पालकांकडून दाखल झालेल्या नाहीत. दर दोन तासांनी शाळा व मार्गदर्शन केंद्रातील अधिकाऱ्यांकडून प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेतला असून कोठेही अडचणी आलेल्या नाहीत. सुरळीतपणे प्रक्रिया सुरु झाली आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

संकेतस्थळ लवकर ओपनच झाले नाही
अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी काही शाळा व मार्गदर्शन केंद्रामध्ये संकेतस्थळ ओपनच झाले नाही. तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडला आहे. दीड तासाने संकेतस्थळ सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुविधा उपलब्ध झाली आहे. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची माहिती विद्यार्थी, पालक, मार्गदर्शन केंद्रावरील अधिकारी यांच्याकडून समजली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here