पुणे – पावसाळापूर्व कामे 31 मेपूर्वी पूर्ण करा

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आदेश

पुणे – पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर पावसाळा पूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ती सर्व 31 मेपूर्वी पूर्ण करावीत आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित विभागांना सोमवारी दिले. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

शहरामध्ये सुरू असलेली 24 तास पाणीपुरवठा योजना, पथ विभाग, पाणी पुरवठा विभाग, मल:निस्सारण विभाग, विद्युत विभाग, प्रकल्प विभाग, क्षेत्रीय कार्यालये इ. विभागामार्फत सुरू असलेल्या कामांसाठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे निर्माण झालेला सर्व राडारोडा 31 मे पूर्वी उचलण्यात यावा असेही आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.

त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी जागेवरील सध्यस्थिती आणि राडारोडा उचलल्यानंतरची परिस्थिती याबाबतचा छायाचित्रासह पूर्तता अहवाल 31मे रोजी सादर करावयाचा आहे. तसेच मेट्रो, गॅस पाइपलाइन आणि केबलची कामे आदी संस्थांनी केलेल्या खोदाईमुळे निर्माण झालेला राडारोडाही 31 मे पूर्वी उचलण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून त्याची पूर्तता करावी, अशीही सूचना या बैठकीत करण्यात आली.

पथ विभागामार्फत सर्व अहवाल एकत्र करुन पालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. पावसाळ्यापूर्वीच्या कामांच्या तयारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या हद्दीत पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडतात, फांद्या तूटून जिवीत आणि वित्तहानी होऊ शकते. या बाबत क्षेत्रीय स्तरावर पावसाळ्यापूर्वी पाहणी करुन धोकादायक वृक्ष, फांद्यांची छाटणीची कार्यवाही त्वरीत कराव्यात. अनेकदा रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यास वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी समन्वय कक्ष स्थापन करून त्या अंतर्गत शहराच्या वृगवेगळ्या भागात तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात यावे, अशाही सूचना यावेळी आयुक्तांनी केल्या.

उद्यान विभाग/वृक्ष संवर्धन विभाग यांच्या मदतीस आपत्कालीन विभाग, अग्निशमन विभाग, विद्युत विभागाच्या सेवकांसोबतच आवश्‍यकतेनुसार विभागांशी समन्वय साधून आपत्कालीन कामे त्वरीत पूर्ण करावीत. यासाठी सर्व साधनसामुग्रीने सज्ज अशी यंत्रणा तयार ठेवावी. संपूर्ण मान्सून कालावधीत ही यंत्रणा कार्यरत राहील याची दक्षता सर्व संबंधित खाते, विभागांनी घ्यावी तसेच त्यानुसार नियोजन करावे असे आदेशही राव यांनी दिले.

हानी न होण्याची काळजी घ्या
पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न झाल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होणे, निवासी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून गंभीर परिस्थिती निर्माण होणे, आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होणे इ. स्वरूपाच्या गंभीर बाबी निर्माण होतात. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे कोणतीही हानी होणार नाही, याची खबरदारी सर्व संबंधित विभागांनी घेणे आवश्‍यक आहे, असेही आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.