श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत जैश ए महंमद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
नामिबयान आणि मरसार या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या भागावर आपले लक्ष केंद्रीत केले होते. त्यावेळी झाडाझडती सुरू असताना ही चकमक झाली. या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून ते जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेशी संबंधीत असल्याची बाब समोर आली आहे.
काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी ही एक मोठी कामगिरी असल्याचे म्हटले असून त्याबद्दल त्यांनी पोलिस व सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आहे. गेले काही दिवस सुरक्षा दलांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहीमेत चांगले यश मिळत असून अनेक दहशतवाद्यांना यात कंठस्नान घातले गेले आहे.