श्रीनगर, दि.18 -दहशतवाद्यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये घडवलेल्या ग्रेनेड स्फोटात 12 नागरिक जखमी झाले. ती घटना पुलवामा जिल्ह्याच्या काकापोरा भागात घडली. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांच्या पथकाला लक्ष्य करून ग्रेनेड डागला. मात्र, दहशतवाद्यांचा नेम चुकल्याने रस्त्यावर पडून त्या ग्रेनेडचा स्फोट झाला. त्या स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले.
ग्रेनेड डागून दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली आहे. जम्मू-काश्मीरात घातपाती कारवाया घडवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे उधळले जात आहेत. चालू वर्षात सुरक्षा दलांनी अनेक धडक मोहिमा हाती घेऊन मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा केला.