मुंबई : करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बांधकाम कामगारांना तसेच घरेलू कामगारांना आर्थिक साह्य देण्याच्या निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या घरेलू कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात सक्रिय व जीवित नोंदणी असलेल्या एकूण 1 लाख 5 हजार 500 घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे एकूण 15 कोटी 82 लाख 50 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
या निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या 1 लाख 5 हजार 500 घरेलू कामगारांच्या बॅंक खात्यामध्ये थेट हस्तांतराद्वारे प्रत्येकी दीड हजार रुपये वितरित करण्याची कार्यवाही विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांच्या स्तरावरून लवकरच करण्यात येत आहे. घरेलू कामगारांच्या थेट खात्यात शासनातर्फे मिळणारा हा निधी जमा होणार असल्याने घरेलू कामगारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
घरेलू कामगारांप्रमाणेच राज्यातील नोंदीत सक्रिय 13 लाख बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत दीड हजार रुपयांचे अर्थसाह्य थेट त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू असून, आतापर्यंत 9 लाख 17 हजार नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसाह्य करण्यात आले आहे. त्याशिवाय गेल्या वर्षीही करोना विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करण्यात आली होती, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.