नवी दिल्ली – प्राप्तीकरदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर येणाऱ्या अडचणींची दखल घेत इन्फोसिसचचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना समक्ष हजर होण्याचे समन्स अर्थमंत्रालयाने बजावले आहे. पारेख यांना 23 ऑगस्टला अर्थमंत्री निर्मली सीतारमन यांच्यासमोर हजर होण्याचे आदेश या समन्सद्वारे बजावण्यात आले आहेत.
हे पोर्टल सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. मात्र त्यातील त्रुटी अद्याप दूर झालेल्या नाहीत त्याचे स्पष्टीकरण अर्थमंत्र्यांना द्यावे लागणार आहे. प्राप्तिकर विवरणपत्राची प्रक्रिया सुलभ, सोपी करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले. मात्र करदात्यांनी त्यावर असंख्य आक्षेप नोंदवले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे संकेतस्थळ विकसित करणाऱ्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि तिचे विद्यमान अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनाही पोर्टलमधील हे दोष दूर करण्याचे आद्रश दिले होते.
इन्फोसीसला हे पोर्टल विकसित करण्याची जबाबादारी 2019 मध्ये सोपवण्यात आली होती. करदात्यांकडून दाखल होणाऱ्या विवरण पत्रावर प्रक्रियेचा कालावधी सध्याच्या 63 दिवसांवरून एक दिवसांवर आणण्याचे उद्दिष्ट यामागे होते.
हे पोर्टल 7 जूनला कार्यान्वित झाल्यापासून अनेक प्रकारच्या अडचणींचा करदात्यांना सामना करावा लागल्याने दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सीतारामन यांच्या ट्विटर टाइमलाइनवर तक्रारींची रीघ लागली होती.
अर्थमंत्र्यांनी ट्वीटद्वारेच या बाबतीत आपला संताप व्यक्त केला होता. इन्फोसिस आणि नंदन निलेकणी हे दर्जेदार व गुणात्मक सेवेची अपेक्षा राखणाऱ्या करदात्यांचा हिरमोड करणार नाहीत अशी आशा आहे,’ असे त्यांनी ट्वीट केले होते.