अकलूज – माळशिरस तालुक्यात गेल्या 40 वर्षापासून एकमेकांच्या विरोधात राजकीय वैर जोपासणारे मोहिते- पाटील व उत्तमराव जानकर हे दोन्ही गट माढा लोकसभा निवडणूक निमित्ताने एकत्र आले असून हा भारतीय जनता पक्षाकरिता मोठा धक्का मानला जात आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात अॅड. सुभाष पाटील व यानंतर उत्तमराव जानकर यांनी नेहमीच भारतीय जनता पक्षाची साथ दिली आहे. मात्र 2019 ला मोहिते-पाटील भारतीय जनता पक्षात आल्यानंतर उत्तम जानकर यांची सतत कुचंबणा सुरू होती. 2019 ला जानकर यांनी भाजपवर विश्वास ठेवून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता.
तसेच रणजितसिंह मोहिते-पाटील व धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही निंबाळकर यांचा हिरीरीने प्रचार करून पहिल्यांदाच माढा लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवले. मात्र दोन वर्षांतच मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय संघर्ष झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला भारतीय जनता पक्ष आपल्याला मदत करेल या आशेवर असलेल्या उत्तम जानकर यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये भ्रमनिरास झाला.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सातपुते यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघात पाठवले. 2019च्या या विधानसभा निवडणुकीत सातपुते व जानकर यांच्या सामना झाला व अवघ्या अडीच हजार मतांनी जानकर यांचा पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे भाजपला साथ देतील, अशी आशा या पक्षाच्या वरिष्ठांना होती.
कारण मागील तीन-चार वर्षांत जानकर यांनी भाजप नेत्यांशीही जुळवून घेतले होते. ते सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात काम करत आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी भाजपविरोधात बंडाचा झेंडा उभारल्यावर उत्तमराव जानकर यांचेही मनोबल वाढले. त्यांनीही 40 वर्षांचा राजकीय संपला आहे.