पुणे – महापालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल 200 कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या जागांसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल सहा महिन्यांपूर्वी लागला होता. मात्र, शारीरिक चाचणी न झाल्याने ही पदभरती रखडली होती. अखेर या चाचणीला मुहूर्त लागला असून ही चाचणी येत्या 26, 27 आणि 28 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.
या चाचणी परिक्षेसाठी आवश्यक असलेली साधने तसेच जागा महापालिकेकडे नसल्याने पालिकेने आधी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यांच्याकडेही ही सुविधा नव्हती अखेर महापालिकेनेच ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने या पदभरतीचा टप्पा मार्गी लागणार आहे. मागील वर्षी महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 पेक्षा अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.