अखेर मध्यप्रदेशला मिळाला आरोग्यमंत्री

शिवराज यांच्या निकटवर्तीयावर महत्त्वाची जबाबदारी
भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी मंत्र्यांचे खातेवाटप केले. त्यामुळे करोना संकटाचा मुकाबला कराव्या लागत असलेल्या त्या राज्याला अखेर महिनाभराच्या खंडानंतर आरोग्यमंत्री लाभला आहे.

कॉंग्रेसला राजकीय बंडामुळे मध्यप्रदेशची सत्ता गमवावी लागली. त्यामुळे त्या राज्यात सत्ताबदल होऊन भाजपने सरकार स्थापन केले. त्यानंतर मागील महिन्यात शिवराज यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, करोनाचा वेगाने फैलाव सुरू झाल्याने त्यांना मंत्रिमंडळाअभावीच कारभाराचा गाडा हाकावा लागला. करोना संकट गडद होत असतानाही मध्यप्रदेशात मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने आणि प्रामुख्याने त्या राज्याला आरोग्यमंत्री नसल्याने शिवराज विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले.

अखेर शिवराज यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यानुसार मंत्रिमंडळात पाच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यातील नरोत्तम मिश्रा या निकटवर्तीयावर शिवराज यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली. मिश्रा यांच्याकडे गृह, आरोग्य आणि कुटूंब कल्याण खाती सोपवण्यात आली. आता करोना संकटाचा मुकाबला करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. मध्यप्रदेशातील करोनाबाधितांच्या संख्येने 1 हजार 500 चा टप्पा ओलांडला आहे. त्या राज्यात आतापर्यंत करोनाने 80 रुग्णांचा बळी घेतला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.