महावितरणकडून ग्राहकांना सेवा उपलब्ध
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी महावितरणने मोबाइलद्वारे मिस्ड कॉल आणि एसएमएस अशी सहज सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे.
वीजग्राहकांना घरबसल्या वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्र्यांनी महावितरणला दिले होते. त्यानुसार ही सुविधा वीजग्राहकांसाठी राज्यभरात सुरु झालेली आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्यासाठी वीजग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत स्वतःच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून महावितरणचा 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. मिस्ड कॉलच्या आधारे ग्राहकांच्या वैयक्तिक लेजरवरून (कन्झुमर पर्सनल लेजर) संगणक प्रणालीद्वारे ग्राहक क्रमांकाचा शोध घेतला जाईल.
24 तासांमध्ये नोंदणी…
मिस्ड कॉल किंवा अन्य एसएमएस सेवांसाठी ग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाइल क्रमाकावरून MREG<space><Consumer Number> हा एसएमएस 9930399303 या मोबाइल क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाची 24 तासांमध्ये महावितरणकडे नोंदणी केली जाईल.